राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर NCP

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची व पुनश्च अध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले.
यावेळी आदरणीय पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “२ मे २०२३ रोजी 'लोक माझे सांगाती' या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या विमोचन समारंभाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.
परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे 'सांगाती' असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली.








Join the discussion
Comments (0)